Sunday 20 September 2020

मनोगत

कुंडीत काहीतरी रुजवायची सवय जुनीच होती.  आम्ही एलफिन्स्टन रोडला राहात होतो, म्हणजे १९७४ - १९७७ या दरम्यान चाळीत डालडाच्या डब्यात तुळस त्यातच आले वगैरे लावले होते.  नंतर सांताक्रूझला आल्यावर तिचे गुलाबप्रेम उफाळून आले. गॅलरीच्या कठड्यावर तिने दोन तीन गुलाबझाडे लावली होती.  खते या विषयावर तेव्हा फारशी माहिती नव्हती.  गुलाबांच्या प्रेमापोटी आई बाजारातून खास गुलाबांसाठी असलेले खत आणायची. मासे धुतलेले पाणी पण ती गुलाबांना घालायची.   

माझा संसार सुरू झाल्यावर मी आईची परंपरा पुढे चालू ठेवली.  जिथे राहिले तिथे काही ना काही रोपे सोबत सांभाळली.  बेलापूरला आल्यावर मात्र गच्चीच्या रुपात जरा बऱ्यापैकी जागा हाताशी आली व मी झाडांकडे गांभीर्याने पाहू लागले.  भारंभार कुंड्या, माती, शेणखत विकत घेऊन शोभेची झाडे व भाजीपाला लावायला सुरवात केली.  पेपरात गुणे कुटुंबाच्या गच्चीतल्या गांडूळखतावर वाढवलेल्या  शेतीबद्दल वाचून तोही प्रयोग केला.

या सगळ्या भानगडीत खते ह्या विषयाकडे कधी लक्ष गेले नव्हते.  पण सोशल मीडिया जसा पसरायला लागला, त्यावरचे वाचन वाढायला लागले तसे शेतीला खतांशिवाय पर्याय नाही, पण खते म्हणजे निव्वळ रसायने, याचे परिणाम भयंकर खतरनाक आहेत वगैरे वाचनात यायला लागले.

पण तरीही वाढत्या लोकसंख्येचे पोट भरायचे तर रासायनिक शेतीला पर्याय नाही हे माझे मत होते, जे अर्थात वाचनानेच बनले होते.

अशातच दोन वर्षांपूर्वी सुभाष पाळेकर हे नाव कानावर पडले.  माझा मूळ स्वभाव सर्व प्रकारच्या बुवा व बाबांपासून दूर राहणारा असल्यामुळे मी त्यांना फारसे गांभीर्याने घेतले नाही.  त्यात त्यांचा देशी गायीच हव्यात हा आग्रह बघून मी थोडी साशंकही होते.

पण घटना अशा घडत गेल्या की मी पाळेकर गुरुजींच्या समूहात आपोआप ओढले गेले. 

या ब्लॉगचा उद्देश मी पाहिलेली सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती हा आहे.  पाळेकरांच्या  तंत्राचा उपयोग मी फारसा केलेला नाही कारण मी अद्याप शेतकरी नाही.